Saturday, January 30, 2010

|| श्री गुरुदेव दत्त ||

||श्री गुरुदेव दत्त||
श्री गुरुदेव दत्त भगवान विष्णूंच्या २४ अवतारांपैकी दत्तात्रय हा एक अवतार मानला जातो। अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र म्हणजे श्रीदत्त. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे अंश दत्ताच्या ठायी एकत्र आले आहेत असे म्हणतात. उत्पत्ती, स्थिती व लय या त्रयींची उपासना म्हणजे दत्ताची उपासना. श्रीदत्तात्रयाचा आवडता वृक्ष म्हणजे औदुंबर.  श्रीदत्ताच्या सोबत गाय हे वाहन आणि आसपास कुत्रे असे चित्र नेहेमी आपण पाहतो. आपले देवही प्राण्यांना सोबत घेऊन आहेत. झाड, फुले, प्राणी, पक्षी यांची सोबत देवांनाही मिळत होती. त्यांच्यातील चैतन्य, मानवतेचा संदेश आजही आपल्याला मिळत असतो. 


जन्माचा इतिहास :


दत्ताचा जन्म चालू मन्वंतराच्या आरंभी प्रथम पर्यायातील त्रेतायुगात झाला, असे वर्णन पुराणांत आढळते. पुराणांनुसार : अत्रीऋषींची पत्‍नी अनसूया ही पतीकाता होती. पातिकात्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु व महेश यांकडे जाऊन म्हणाले, "तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.'' हे ऐकून त्रिमूर्ती रागावले व म्हणाले, "एवढी काय मोठी पतीकाता, सती आहे, ते आपण पाहू.'' एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले व अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, "ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.'' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, "ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. "आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता", असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत. '' मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले व जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, "आमचा असा नियम आहे की आम्ही विवस्त्र व्यक्तिकडून भिक्षा घेतो तेव्हा  तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.'' त्यावर `अतिथीला विन्मुख पाठविणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, "मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.'' मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, `अतिथी माझी मुले आहेत' व विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करविले व बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, `हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).'  त्यानंतर अत्रीऋषींनी अंतर्ज्ञानाने बाळांचे खरे रूप ओळखून त्यांना नमस्कार केला. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु व महेश त्यांच्यासमोर उभे राहिले व प्रसन्न होऊन `वर मागा', असे म्हणाले. अत्री व अनसूयेने `बालके आमच्या घरी रहावी', असा वर मागितला. तो वर देऊन देव आपापल्या लोकात गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त व शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र व दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी परवानगी घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी व तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. हेच गुरूंचे मूळपीठ.


श्रीदत्तजयंती


एक सांप्रदायिक जन्मोत्सव। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्रीदत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात. दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.


दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्‍ताह असे म्हणतात. भजन, पूजन व विशेषकरून कीर्तन वगैरे भक्‍तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते व त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.


औदुंबर हे सांगली - मिरजेजवळ, भिलवडी स्टेशनपासून ५ कि.मी. अंतरावर आहे. कृष्णा नदीच्या काठावरचे येथील श्रीदत्ताचे देऊळ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे.श्रीक्षेत्र गाणगापूर हे भीमा-अमरजा संगमावर असून पुणे-रायचूर या लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून १५ ते २० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या दोन्ही ठिकाणी भाविक श्रद्धेने दर्शनासाठी जातात. महाराष्ट्रातच दत्तभक्त मोठ्या प्रमाणात आहेत. औदुंबर, कारंजा (विदर्भातील स्थान) या ठिकाणी दत्तजयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते.




परिवाराचा भावार्थ
 गाय (पाठीमागे असलेली) : पृथ्वी व कामधेनू (इच्छिलेले देणारी)


चार कुत्रे १. चार वेद, २. गाय व कुत्रे ही एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून व कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात. इ.


औदुंबर वृक्ष : 
दत्ताचे पूजनीय रूप; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.
`कमंडलू हे त्यागाचे प्रतीक - कमंडलू व दंड या वस्तू संन्याशाच्या बरोबर असतात. संन्यासी विरक्‍त असतो. कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे; कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय.
`त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ व भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ - त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ व भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण फरक आढळतो। त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग व वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही. त्रिशूळावरील वस्त्र हे ध्वजाचे प्रतीक आहे.


नामाचा   भावार्थ


दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला :
दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत', अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.


दत्तगुरु (जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटणारा) : 
`दत्त हे तत्त्व जिवाकडून कोणत्याच सगुण-निर्गुण भावाची अपेक्षा न ठेवता जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटत असते; म्हणूनच ते सर्व लोकांत `दत्तगुरु' या नावाने ओळखले जाते।


अवधूत (दत्त म्हणजे सगुण दत्तात्रेय म्हणजे निर्गुण, या दोन रूपांना जोडणारा) :
`अवधूत' म्हणजे जिवाच्या देहातील अष्ट अवधाने नियंत्रित करून त्याला सगुणातून निर्गुणाची दिशा दाखवणारा. अवधूत हे दत्त व दत्तात्रेय या दोन रूपांना जोडणारे माध्यम आहे. दत्त (ब्रह्मा, विष्णु व महेश यांचा मूर्त-स्वरूप आविष्कार) हा सगुण, तर दत्तात्रेय (ब्रह्मा, विष्णु व महेश या तत्त्वरूपी त्रयींचा प्रकाशरूपी आविष्कार) हा निर्गुणाशी संबंधित आहे. `अवधूत' हे दत्ताच्या तेजाची प्रभावळ घेऊन जन्माला येणारे तत्त्व आहे.


दिगंबर (मोक्षात विलीन होईपर्यंत साथ देणारा) : 
`दिगंबर' म्हणजे अंबररूपी व्याप्‍त प्रकाशात, म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व.


श्रीपाद (`श्री' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारा) :
`श्री' म्हणजे ईश्‍वराचे अविनाशी तत्त्व. अशा ईश्‍वररूपी अविनाशी तत्त्वाच्या, म्हणजेच `श्री\' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्त्व, म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्त्व.


वल्लभ (अभय देणारा)
 भय निर्माण करणार्‍या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जिवांना अभय देणारे तत्त्व, म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्त्व.


श्रीदत्ताच्या नामजपामुळे होणारे फायदे

श्री गुरुदेव दत्त नामजपाचे महत्त्व`श्री गुरुदेव दत्त' नामजपपूर्वजांच्या त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्‌भवणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी दररोज `श्री गुरुदेव दत्त असा जप करावा दत्त या देवतेकडून जिवाला जास्त प्रमाणात सात्त्विक शक्‍ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्‍तींशी लढू शकतो. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्‍ती मिळते. इ. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्‍तींचा त्रास कमी होतो. ई. पूर्वजांना गती मिळते व त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास मदत होते.





No comments:

Post a Comment